आजच्या ब्लॉगमध्ये आपण कॅन्सरमध्ये किंवा कीमोथेरपी दरम्यान काय खावे, काय नाही याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी कीमोथेरपी म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात.
कीमोथेरपी म्हणजे काय ?
कर्करोगाच्या पेशी मारून टाकण्यासाठी आणि कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू नये यासाठी वापरली जाणारी औषध प्रणाली म्हणजेच कीमोथेरपी होय.
– कीमोथेरपी उपचार पद्धतीमध्ये औषधाच्या मदतीने अनियंत्रितपणे वाढ झालेल्या पेशी नष्ट केल्या जातात.
– कीमोथेरपी ही उपचार पद्धती कर्करोगासाठी उत्तम मानली जाते यामुळे कर्करोगाच्या पेशींचे पुनरुत्पादन रोखले जाऊ शकते आणि कर्करोगाच्या पेशी शरीरामध्ये वाढू न देणे किंवा पसरू न देणे असे फायदे कीमोथेरपी मुळे होतात.
– कीमोथेरपी विविध मार्गाने केले जाऊ शकते उदाहरणार्थ, इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलरली म्हणजेच स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा, सबक्युटेनसली ( त्वचेखाली ), तोंडावाटे, इंट्राथेकली.
– कीमोथेरपी कोणत्याही मार्गाने दिली तरी सुद्धा रक्तप्रवाहमार्फत शरीरामध्ये वाहून नेले जातात आणि कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहोचवली जातात.
कॅन्सरमध्ये कीमोथेरपी दरम्यान काय खावे ?
कीमोथेरपी दरम्यान योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. कीमोथेरपी दरम्यान काही रुग्णांना दुष्परिणाम सुद्धा जाणवू शकतात परंतु प्रत्येक व्यक्तीला दुष्परिणाम जाणवतीलच असे नाही किंवा किती प्रमाणामध्ये किंवा कोणते दुष्परिणाम जाणवू शकतात हे प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळे असू. कीमोथेरपी दरम्यान उलट्या, भूक न लागणे, अतिसार, बद्धकोष्ठता, थकवा जाणवणे यांसारखे काही दुष्परिणाम जाणवू शकतात.
कॅन्सरमध्ये कीमोथेरपी दरम्यान व्यक्तीने दररोज पुढील प्रमाणे आहाराचे सेवन केले पाहिजे :
*जर समजा कॅन्सर झालेल्या व्यक्तीला मधुमेह किंवा उच्च बीपीचा त्रास असेल तर त्यानुसार अधिक योग्य पद्धतीने आहार घेणे आवश्यक आहे त्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घेऊन डायट चार्ट बनवून घेऊ शकता.
१. प्रथिने –
• शरीराच्या प्रति किलो वजनासाठी १.२ ते १.५ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते.
• प्रत्येकाने स्वतःच्या वजनानुसार ,
स्वतःचे वजन × प्रति किलो वजनासाठी असणारे प्रथिने = शरीरासाठी आवश्यक प्रथिने.
• अशाप्रकारे शरीरासाठी किती प्रथिने आवश्यक आहे यानुसार आहार घेतला पाहिजे.
• प्रथिनांसाठी व्हेजिटेरियन लोक पनीर, मसूर , हरभरा, डाळींचा समावेश आहारामध्ये करू शकता तर नॉनव्हेज खाणारे लोक अंडी ,चिकन,मासे खाऊ शकता परंतु यामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेले मांस आणि लाल मांस खाणे टाळा.
२. कर्बोदके –
• एकूण कॅलरी पैकी 55% इतकी कॅलरी कर्बोदकांमध्ये असणे आवश्यक आहे.
ज्वारी, बाजरी, तांदूळ ,गहू हे कार्बोहायड्रेटचे चांगले स्रोत आहेत.
३. चरबी / फॅट्स –
• एकूण कॅलरी पैकी 30 टक्के कॅलरी फॅट्सच्या असणे गरजेचे आहे.
• नट्स, पीनट बटर, तेल, दूध, चीज यांचा उपयोग आहारामध्ये करू शकतो.
४. फळे आणि भाज्या –
• फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्व तसेच अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे फळांचे आणि भाज्यांचे सुद्धा सेवन केले पाहिजे.
कॅन्सरमध्ये कीमोथेरपी दरम्यान काय खाऊ नये ?
कीमोथेरपी दरम्यान दुष्परिणाम अधिक तीव्रतेने जाणवू न देण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे ते पुढील प्रमाणे :
१. अन पाश्चराईजड चीज आणि दुग्धजन्य पदार्थ –
कॅन्सर असणाऱ्या रुग्णांनी पाश्चराइजड दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते कारण जे दुग्धजन्य पदार्थ किंवा चीज पाश्चर केलेले नसतात अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्यामध्ये लिस्टेरिया यासारखे विविध जिवाणू असतात आणि यामुळे संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो, ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे अशांमध्ये असा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळेच अन पाश्चराईजड चीज आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे.
२. थंडगार तसेच तयार असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे –
– थंडगार तसेच खाण्यास तयार असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे कारण असे अन्नपदार्थ सुरक्षित स्थितीमध्ये न ठेवले गेल्यास त्यामध्ये साल्मोनेला किंवा लिस्टेरिया यांसारखे जिवाणू असू शकतात आणि त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
३. अंकुरित किंवा पाने असलेल्या काही भाज्या –
अंकुरित म्हणजेच स्प्राऊट ज्यामध्ये बीन प्राउड्स, अल्फाल्फा, कोथिंबीर यांसारख्या कच्च्या पानांमध्ये सुद्धा विविध प्रकारचे जिवाणू आढळू शकतात उदाहरणार्थ कोलाय, यामुळे ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा रुग्णांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणूनच व्यवस्थित रित्या शिजवलेल्या भाज्या खाव्यात.
४. कमी शिजवलेले पदार्थ किंवा अंडी –
साल्मोनेला यांसारखे जिवाणू कमी शिजवलेल्या अंड्यामध्ये किंवा पदार्थांमध्ये असू शकतात त्यामुळे कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या रुग्णांना याचा त्रास होऊ शकतो, संसर्ग वाढू शकतो म्हणूनच कमी शिजवलेले पदार्थ किंवा अंडी खाणे सुद्धा टाळावे.
५. न धुतलेल्या भाज्या किंवा फळे –
न धुतलेल्या फळांचे किंवा भाज्यांचे सेवन केले गेल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा हानिकारक परजीवी असू शकतात आणि त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली नाही अशा रुग्णांना त्रास होऊन संसर्ग वाढू शकतो त्यामुळे फळे आणि भाज्या नेहमी धुवूनच खाव्यात. तसेच कातडी असलेली कच्ची फळे आणि भाज्या यामध्ये काही फळे आणि भाज्या पचण्यासाठी जड असू शकतात ते खाणे सुद्धा टाळावे.
६. अल्कोहोल –
कीमोथेरपी दरम्यान अल्कोहोल घेणे सुद्धा टाळावे.
७. मसालेदार पदार्थ –
मसालेदार पदार्थ कीमोथेरपी दरम्यान खाल्ल्याने सुद्धा पोटामध्ये त्रास जाणवू शकतो ,त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
८. तळलेले पदार्थ –
कीमोथेरपी दरम्यान तळलेले पदार्थ खाणे सुद्धा टाळावे, तळलेले पदार्थ खाल्ल्यास मळमळ होऊ शकते.
अशाप्रकारे कीमोथेरपी दरम्यान योग्य आहार घेणे आवश्यक आहेच त्यासोबतच काही खाद्यपदार्थ न खाणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
पुण्यामधील प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत कॅन्सर ग्रस्त रुग्णांची सर्वतोपरी व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली जाते आणि व्यवस्थित ट्रीटमेंट केली जाते.प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या www.prolifecancercentre.co.in या अधिकृत वेबसाईटवरून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.