बदल हा निसर्गाचा नियम आहे. असं म्हटलं जातं पण हाच नियम कोलोरेक्टल कॅन्सरच्या उपचार पद्धतीत वापरला गेला तर काही वावगं वाटायचं कारण नाही. अगोदरच्या काही वर्षांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्राथमिक निदान पेशंट आणि त्याच्या कुटुंबासाठी अगदी शेवटची घटिका ठरायचे जसजसा काळ बदलत गेला तसतशी या कॅन्सर वरची उपचार पद्धती बदलत गेली .
सर्वप्रथम कोलोरेक्टल कॅन्सर (गुदाशयाचा कॅन्सर) म्हणजे काय ते जाणून घेऊ. रेक्टम म्हणजेच मल साठवण्याचे कार्य करणारा आपल्या शरीराचा मोठ्या आतड्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यातील भाग. या गुदाशयामध्ये होणारी ट्यूमरस ग्रोथ म्हणजे हा कोलोरेक्टल कॅन्सर. हा लवकर पकड मध्ये येत नाही कारण याची लक्षणे ही सर्वसाधारणपणे मुळव्याधी सारखीच असतात पण मुळव्याध आणि या कॅन्सरमध्ये खूप मोठा फरक आहे हे आवर्जून नमूद करतो. संडास मधून रक्त जाणे, गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा जी सहजगत्या दुर्लक्षित केली जातात अशी ही लक्षणे आहेत, पण या लक्षणा बरोबरच नॅरो स्टूल म्हणजे संडासच्या आकारातील बदल आणि शौचातून रक्त याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरतं.
अगोदरच्या उपचार पद्धतीमध्ये सर्वसामान्यपणे केमोथेरपी, रेडिएशन व अखेरीस सर्जरी या पायऱ्या असायच्या पण यामध्ये पेशंटला संडासची जागा पोटावरूनच बाहेर काढली जायची .पेशंटला सर्वत्र ती पिशवी घेऊन वावरावं लागायचं जे खरोखरीच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कष्टप्रद असायचं. त्याच्याही पुढे उपचार पद्धतीमध्ये लेप्रोस्कोपिक सर्जरी हा थोडा त्याहून सरस पर्याय पुढे आला पण कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये याद्वार सर्जरी करतानाही काही मर्यादा येतच राहिल्या. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्येही पेशंटच्या मुख्य अडचणीवरचा उपाय अपूर्णच राहिला .
रोबोटिक तंत्रज्ञान
ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी सर्जरी सारख्या पारंपारिक शस्त्रक्रियेला फाटा देऊन रोबोटिक शस्त्रक्रियेचे नव्याने वरदान या कोलोरेक्टल कॅन्सरलाच नव्हे तर इतर शस्त्रक्रियेलाही वैद्यकीय क्षेत्रात लाभले आहे. पण सर्वसामान्य लोकांमध्ये रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट सर्व ऑपरेशन करतो व डॉक्टर फक्त निरीक्षण करतात असा गैरसमज आहे .खरंतर या तंत्रज्ञानामध्ये रोबोटचे सर्व आर्म्स सर्जन द्वारे ऑपरेट केले जातात. पारंपारिक पद्धतीमध्ये 2D इमेज वर अवलंबून राहावे लागायचे पण या तंत्रज्ञानाद्वारे 3D इमेज मुळे स्पष्टता व अचूकता वाढते. खूप किचकट शस्त्रक्रिया सुद्धा डॉक्टर करू शकतात.
कोलोरेक्टल कॅन्सरचा ट्यूमर हा गुद्दद्वाराच्या थोड्या वरच्या भागात खुब्याच्या आत मध्ये असतो अशा ठिकाणी 2D व्हिजनवर व सर्जनच्या हाताच्या हालचालीवर मर्यादा येतात. यासाठी या ठिकाणी 360 डिग्रीमध्ये, मॅग्नीफाइड व्हिजनमुळे अगदी अवघड आणि किचकट आतील भागामध्ये कॅन्सरच्या पेशी राहिल्या आहेत की नाही हेही पाहता येते. यासाठी डॉक्टरांना मॅग्नीफाइड व्ह्यू हवा असतो. हे रोबोटिक तंत्रज्ञान अगदी तो व्ह्यू स्पष्टपणे देते. शेवटी या किचकट शस्त्रक्रियेमध्ये मानवी हातांच्या हालचालींना मर्यादा येतात. हाताच्या ३६० डिग्री मध्ये होणाऱ्या हालचाली हव्या असतात. रोबोटच्या हाताच्या ह्या हालचाली जश्या पाहिजेत तशा करता येतात.
पारंपरिक शस्त्रक्रियेत पेशंटच्या मनावर परिणाम करणारा मुख्य मुद्दा म्हणजे संडासाची जागा कायमची काढून टाकून पोटावर कायमचा संडास बसवावा लागतो. पण या तंत्रज्ञानाद्वारे ही समस्या टाळता येते. एवढेच नाही तर कॅन्सरग्रस्त पार्ट काढून टाकून गुदद्वाराचे स्नायू वाचवून हे करता येते. ही याची खूप मोठी आणि आश्वासक उपलब्धी आहे.
सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान तसे फायदेशीर ठरत आहे पण कोलोरेक्टल कॅन्सर शस्त्रक्रियेमध्ये विशेष करून याचा खूप जास्त आणि उत्तम परिणाम देणारा उपयोग सिद्ध होताना दिसून येतो .याबरोबरच रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारा हातही तितका कौशल्यपूर्ण असावा लागतो, हे सांगण्याची आवश्यकता नाही.