स्तनाच्या कर्करोगाविषयी निराधार भीती नको

breast cancer prvention

तिचे वय अवघे २७ वर्षे असेल. हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत ती काम करते. ऑफिसमध्ये अन्य मुलींशी चर्चा करताना स्तनाच्या कर्करोगाचा (Breast Cancer) विषय निघाला. काही दिवसांपासून तिलाही स्तनाच्या जागी छोटीशी गाठ असल्यासारखे वाटत होते. ती थोडी घाबरली आणि थेट गुगल केले. स्तनाच्या कर्करोगाची माहिती इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती, पण तिच्या मनासारखे उत्तर तिला मिळाले नाही. आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर संपूर्ण स्तन काढून टाकावा लागेल अशी भीती तिला वाटत होती.

अखेर तिने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला स्तन संवर्धनाच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आणि स्तन काढून टाकण्याची भीती निराधार असल्याचे अश्वस्त केले.

असे प्रसंग, अनेक मुली वा महिलांच्या आयुष्यात येत असतील. बऱ्याचदा गैरसमजातून किंवा अपूर्ण आणि अयोग्य माहिती वाचून, ऐकून त्यांच्या मनात कर्करोगाच्या उपचाराविषयी (Cancer Treatment) भीती निर्माण होते. भारतामध्ये २२ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) जडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या, गर्भाशय मुखाचा (Cervical and Uterus) आणि अंडाशयातील (Ovarian Cancer) अशा विविध प्रकारच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे जाणवते.

 महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी (Breast Cancer) अधिक गैरसमज निर्माण झाले आहेत. विशेषतः हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिने स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर तर तरुण मुलींमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी (Breast Cancer) एकीकडे जनजागृती झाली, पण दुसरीकडे अनेक गैरसमजही पसरले.

महिलांनी कर्करोग तज्ज्ञांचा (Cancer Specialists) सल्ला घेतल्यास त्यांच्या मनातील अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आता पूर्वीप्रमाणे कर्करोग झालेला स्तन पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. ट्युमरचा आकार लहान असेल तर स्तन संवर्धनाची शस्त्रक्रिया (Breast Conservation Surgery) करता येते. तसेच, ट्युमरचा आकार मोठा असला तरी केमोथेरपी च्या मदतीने स्तन संवर्धनाच्या शस्त्रक्रियेत यश मिळते. प्लास्टिक सर्जरी तसेच कृत्रिम स्तनांचाही (Breast Reconstruction) पर्यायही उपलब्ध आहे. मुळे महिलांनी घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचारांची पद्धत निवडण्याची गरज असते.

तुम्ही काय करू शकता

  • वयाच्या ३० वर्षा र दर महिन्याला स्वतःच स्वतःच्या स्तनाची तपासणी ठरावीक वेळेला व पद्धतीने करा
  • वयाच्या ४० वर्षांनंतर मॅमोग्राफी (Mammography) (स्तनाचा एक्स-रे) दरवर्षी करून घ्या
  • तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत क्लिनिकल तपासणी करून घ्या
  • स्तन संवर्धन शस्त्रक्रिया (Breast Conservation Surgery), आँकोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरी (Oncoplastic Breast Surgery), फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन (Flap Reconstruction), इम्प्लांट (Implant), सेंटिनल लिंफ नोड बायोप्सी (Sentinel Lymph Node Biopsy) यासह उपलब्ध अनेक पर्यायांपैकी एक पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित करा

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

  • वेदना न होणारी गाठ स्तनात आढळणे, काखेतही गाठी होऊ शकतात
  • काळपट वा लालसर रंगाचा स्राव स्तनातून बाहेर पडणे
  • स्तन दुखणे, कडक आणि लालसर होणे
  • स्तनाग्रांच्या बाजूची त्वचा सुरकुतलेल्या प्रमाणे दिसणे

स्तनाच्या कर्करोगाचा वाढता धोका

  • एक लाख महिलांमध्ये २५.८ महिला स्तनाच्या कर्करोगाने बाधित.
  • एक लाखापैकी १२.७ महिला दगावतात (केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार)