धकाधकी …. धावपळ म्हणजेच आयुष्य हेच जणू आजकालचे समिकरण बनत चालले आहे. या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाला मुळी वेळच नाही. त्यातल्या त्यात जर ती स्त्री असेन ….. मग ती वर्कींग वुमन असो अथवा गृहिणी तिला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणं दुरावास्तच….. सुरुवातीला कदाचित कोणतीही लक्षणे न दाखवता अतिशय धिम्या गतीने वाढणारा हा आजार…….;गर्भाशयाचा कॅन्सर; सर्व्हिक्स (स्त्रियांच्या गर्भपिशवी व योनीला जोडणारा अवयव)च्या उतीमध्ये तयार होणारा हा गर्भाशयाचा कर्करोग सर्वसाधारणपणे साठी ओलांडल्यानंतर उद्वभवणारा हा आजार ८०% स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो. जागतिक स्तरावर दरवर्षी पाच लाखांहून अधिक महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो हा WHO चा अहवाल आहे; फक्त भारताचा विचार केला तर या कर्करोगाचे दरवर्षी एक लाखाच्या वर रुग्ण समोर येतात. या आजाराने मृत्यू होण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी महिना हा गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकतेचा महिना आहे. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. सुरुवातीला या कर्करोगामध्ये कदाचित कोणतीही लक्षणे उद्ववभवनार नाहीत…. पण सर्वाधिक सामाईक लक्षण म्हणजे योनिमार्गातून पांढरा किंवा लाल स्राव जाणे, आस्वाभाविकरीत्या होणार रक्तस्त्राव; मासिक पाळी दीर्घकाळ राहणे किंवा पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव, संभोगानंतरचा नेहमीच रक्तस्त्राव, डाऊचिंग ही इतर काही लक्षणे सांगता येतील.
पण कधीकधी तिसऱ्या स्टेजपर्यंत या रोगाची सुस्पष्ट अशी लक्षणे दिसुन येत नाहीत हीच काळजी वाटणारी बाब. या गंभीर आजाराची कारणमीमांसा करायची झाल्यास…… कर्करोग पूर्व टप्प्यावर या गर्भाशय कर्करोगाचे निदान होणे कठीण असते कारण जादातर स्त्रिया या आजाराच्या प्रतिबंधात्मक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. एच पी व्ही नावाच्या विषाणूंचे संक्रमण हे जवळजवळ सर्वच गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण म्हणता येईल. काही कुटुंबांमध्ये हा आनुवंशिक असु शकतो. मौखिक गर्भ निरोधक गोळ्यांच्या दीर्घकालीन सेवनाने हा धोका वाढू शकतो. पण या गोळ्या बंद केल्या की धोका कमी होतो .
धूम्रपान, असुरक्षित संभोगामुळे एच पी व्ही पसरू शकतॊ व धोका वाढतॊ. या कर्करोगाचे निदान फार पुढच्या टप्प्यावर होत असल्याने या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लहान वयातच (9 ते 26 वर्ष) मुलींना एच पी व्ही विषाणू विरोधातील लस देणे हा एक चांगला पर्याय आहे; या लसीमुळे पुर्णपणे कॅन्सर पासून सरंक्षण मिळतेच असे नाही. याचा धोका निश्चितच कमी होतो मात्र संपत नाही. हा धोका नियमित स्किनींग टेस्टने कमी करता येऊ शकतो. जर गर्भाशय पिशवीमध्ये अस्वाभाविक बदल दिसून आले तर त्या कर्कपेशी बनण्या पूर्वी नष्ट करून कर्करोग प्रतिबंधित करता येऊ शकतो.
पॅप स्मिअर; किंवा पॅप टेस्ट म्हणजेच स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी. यापैकी पॅप स्मिअरच्या साहाय्याने सुरवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले तर त्यातून बचावण्याची शक्यता वाढते. ३० ते ५० वयोगटातील स्त्रियांनी पॅप स्मिअर दर ३ वर्षातून एकदा किंवा HPV – DNA टेस्ट दर ५ वर्षातून एकदा करावयाची असते. जर या तपासण्या नॉर्मल असतील तर सर्व्हिकल कॅन्सरचा धोका संभवत नाही. परंतु जर काही पेशींमध्ये बदल आढळले तर लवकर उपचार करून वेळीच कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखू शकतो. शस्त्रक्रिया रेडिओथेरपी, केमोथेरपी या प्रकारच्या उपचारपद्धती गर्भाशयाचा
कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात.
जर एखाद्या स्त्रीला संभाव्य लक्षणे असतील तर त्वरित कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा वेळेस बायोप्सी म्हणजेच कॅन्सरच्या गाठीचा छोटा तुकडा काढून पॅथॉलॉजिस्ट कडून तपासणे गरजेचे असते. निदान झाल्यानंतर आजार किती पसरला आहे म्हणजेच कुठल्या स्टेजमध्ये आहे हे पाहण्यासाठी टफ्कची तपासणी करावी लागते.
पहिल्या व दुसऱ्या स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करून आजार बरा होऊ शकतो. हि शस्त्रक्रिया पूर्णपणे दुर्बिणीद्वारे होऊ शकते. जेणेकरून रुग्णांना वेदना कमी होतात, ऑपेरेशन करतेवेळी रक्तस्राव कमी होतो. रुग्ण ३ ते ४ दिवसांत घरी जाऊ शकतात. तसेच दैनंदिन कामकाज लगेच करू शकतात.
तिसऱ्या स्टेजमध्ये क्ष किरणांची उपचार पद्धती वापरण्यात येते, परंतु या स्टेजमध्ये ६०-७०% रुग्ण बरे होऊ शकतात. चौथ्या स्टेजमध्ये केमोथेरपी दिली जाते, जेणेकरून आजारावर नियंत्रण मिळवता येईल व रुग्णाचे आयुष्य सुखकर केले जाईल.
या कर्करोगाला स्त्रियांनी व्यवस्थित समजून घेऊन योग्य ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे व प्रतिबंधात्मक चाचण्या करणे गरजेचे आहे. स्त्रियांनी निसंकोचपणे आपल्याला होणारा त्रास सांगणे गरजेचे असते व वेळीच उपचार घेऊन आजारावर मात करणे गरजेचे असते.
Source: Lokmat News