थायरॉईड ग्रंथीची गाठ… हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात धडकी भरते. मात्र, प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते आणि आज कर्करोग असो वा बिनाइन गाठ, रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे उपचार अधिक सुरक्षित, अचूक आणि रुग्णांसाठी सोपे झाले आहेत.
थायरॉईडच्या गाठी वाढताहेत, पण घाबरू नका :
भारतात थायरॉईडच्या गाठींचे प्रमाण गेल्या २० वर्षांत तिपटीने वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोनोग्राफी सहज उपलब्ध झाल्याने लहान गाठींचेही निदान होऊ लागले आहे. स्त्रियांमध्ये हा त्रास पुरुषांच्या तुलनेत ३ पट अधिक आढळतो. चांगली गोष्ट म्हणजे ८५% गाठी बिनाइन म्हणजेच कर्करोग नसलेल्या असतात आणि पॉपिलरी थायरॉईड कॅन्सर, जो ८०% कर्करोग रुग्णांमध्ये आढळतो, त्याचा १० वर्षांचा जगण्याचा दर ९८% पेक्षा जास्त आहे. फक्त योग्य वेळी योग्य उपचार मिळणे महत्त्वाचे.
पारंपरिक शस्त्रक्रियेतील अडचणी :
आजवर थायरॉईड काढण्यासाठी गळ्यावर ६ ते ८ सेंमीचा आडवा छेद घेतला जात असे. शस्त्रक्रियेनंतर गळ्यावर कायमचा व्रण राहत असे. अनेक तरुण-तरुणी, विशेषतः स्त्रिया, फक्त व्रणामुळे शस्त्रक्रिया टाळतात. बिनाइन गाठीसाठी इतका मोठा व्रण घेणे त्यांना मान्य नसते. याशिवाय पारंपरिक शस्त्रक्रियेत आवाजाची नस म्हणजेच ‘रिकरंट लॅरिन्जियल नर्व्ह’ आणि कॅल्शियम नियंत्रित करणाऱ्या ‘पॅराथायरॉईड’ ग्रंथींना इजा होण्याचा धोका २ ते ५% असतो. आवाज बसणे किंवा आयुष्यभर कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागणे, या गुंतागुंती रुग्णांचे जीवनमान बिघडवतात.
रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय? :
रोबोटिक थायरॉइडेक्टॉमीमध्ये सर्जन स्वतः शस्त्रक्रिया करतो, पण रोबोटच्या मदतीने. ‘दा विंची’ रोबोटिक प्रणालीत सर्जन कन्सोलवर बसून त्रिमितीय, १० पट मोठी प्रतिमा पाहत, रोबोटच्या बारीक हातांनी शस्त्रक्रिया करतो. सर्जनच्या हाताचे थरथरणे रोबोट पूर्णपणे थांबवतो. यामुळे अत्यंत नाजूक नसांभोवतीची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते.
रोबोटिकचे ५ मोठे फायदे – कॅंसर व बिनाइन दोन्हीसाठी
१) गळ्यावर व्रण नाही : “स्कारलेस सर्जरी” रोबोटिक थायरॉईड शस्त्रक्रिया काखेतून छेद घेऊन केली जाते. गळ्यावर एकही टाका पडत नाही. जागतिक आकडेवारीनुसार रोबोटिक थायरॉईड शस्त्रक्रियेपैकी ७०% शस्त्रक्रिया बिनाइन गाठींसाठी होतात. कारण कर्करोग नसतानाही गळ्यावर आयुष्यभराचा व्रण कोणालाही नको असतो. १८-३५ वयोगटातील तरुणींसाठी हे वरदान आहे.
२) आवाजाची नस सुरक्षित : रोबोट १० पट मोठी 3D प्रतिमा आणि ‘इंट्राऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग’मुळे १ मिमीची आवाजाची नससुद्धा स्पष्ट दिसते. त्यामुळे आवाज बसण्याचे प्रमाण १% पेक्षा कमी झाले आहे. बिनाइन गाठींमध्ये तर हे प्रमाण ०.५% पेक्षा कमी आहे.
३) कमी वेदना, जलद रुग्णालयातून सुट्टी : काखेतून केलेल्या छेदामुळे घसा दुखत नाही. रुग्ण दुसऱ्या दिवशी जेवू शकतो आणि २४ ते ४८ तासांत घरी जाऊ शकतो. अनेक बिनाइन रुग्ण ‘डे-केअर’ म्हणजे एका दिवसात घरी जातात.
४) कॅल्शियमच्या ग्रंथी सुरक्षित : पॅराथायरॉईड ग्रंथी थायरॉईडच्या अगदी मागे असतात. रोबोटच्या अचूकतेमुळे या ग्रंथींना रक्तपुरवठा जपता येतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर कॅल्शियम कमी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते.
५) कर्करोग पूर्णपणे काढणे शक्य, बिनाइनमध्येही अचूकता : कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत कॅन्सर पूर्ण काढणे महत्त्वाचे, तर बिनाइन गाठीत आजूबाजूची निरोगी ग्रंथी वाचवणे महत्त्वाचे. रोबोटिक प्रणालीमुळे दोन्ही शक्य होते. २ ते ६ सेंमी आकाराच्या बिनाइन गाठी, विषारी गाठी (Toxic Adenoma), आणि FNAC मध्ये शंका असलेल्या गाठींसाठी रोबोटिक लोबेक्टॉमी हा उत्तम पर्याय आहे.
कोणासाठी योग्य? :
२ ते ६ सेंमी आकाराची गाठ, मानेतील लिम्फ नोड्समध्ये मर्यादित पसरलेला कर्करोग आणि पूर्वी मानेवर शस्त्रक्रिया न झालेल्या रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उत्तम आहे. विशेषतः ४५ वर्षांखालील रुग्ण, ज्यांना कॉस्मेटिक परिणाम महत्त्वाचा आहे, त्यांनी बिनाइन गाठीसाठीही रोबोटिकचा विचार करावा. मात्र, ६-७ सेंमीपेक्षा मोठी गाठ, छातीत उतरलेली गाठ किंवा पूर्वी रेडिएशन घेतलेल्या रुग्णांमध्ये खुली शस्त्रक्रिया करावी.
पुणे शहरात रोबोटिक थायरॉईड शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. खर्च थोडा जास्त असला तरी व्रण न राहणे, आवाज सुरक्षित राहणे आणि लवकर कामावर रुजू होणे यामुळे दीर्घकालीन फायदा होतो. सोल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या २८०० रुग्णांच्या अभ्यासानुसार रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर समाधानाचा स्कोअर ९.८/१० आहे, तर खुल्या शस्त्रक्रियेत तो ६.२/१० आहे.
संदेश :
थायरॉईडची गाठ दिसल्यास घाबरू नका. ती कर्करोगाची असेलच असे नाही. एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा कॅन्सर सर्जनचा सल्ला घ्या. FNAC बायोप्सी करून निदान नक्की करा. जर शस्त्रक्रिया गरजेची असेल तर ‘माझ्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? माझ्या गळ्यावर व्रण नको असेल तर पर्याय काय?’ हा प्रश्न तुमच्या डॉक्टरांना जरूर विचारा. कारण, गळा हा सौंदर्याचा भाग आहे आणि आवाज ही तुमची ओळख आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया दोन्ही जपते – कर्करोग असो वा नसो.
रोबोटिक जीआय व कॅन्सर सर्जन प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
Contact Us
Name – Dr. Sumit Shah – Breast, Oral, Colon Cancer Specialist in Pune | Prolife Cancer Centre
Address: 557A1, 15C, Jawaharlal Nehru Rd, Market Yard, Gultekadi, Pune, Maharashtra 411037
Phone: 96070 79019

